ग्रामीण (कला,वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर,मुखेड जि. नांदेड
मराठी विभाग
सत्र – तिसरे
अभ्यासक्रम –मराठी (ऐच्छिक)
बी.ए.व्दितीय वर्ष
अभ्यासपत्रिका – पाचवी
निवडक मराठी गद्य
डॉ.कविता लोहाळे
शैक्षणिक वर्ष २०२० -२०२१ पासून
अभ्यासक्रम – मराठी (ऐच्छिक)
सत्र – तिसरे
बी.ए. व्दितीय वर्ष
अभ्यासपत्रिका – पाचवी
निवडक मराठी गदय – V
निवडक मराठी गदय -V
उद्दिष्टे :
१) मराठी गदय साहित्याची ओळख करून देणे.
२) ऐतिहासिक टप्प्यावरील बदलते गदय अभ्यासणे.
३) मध्ययुगीन आधुनिक काळातील गदय लेखनाचे बारकावे तपासणे.
४) गदय साहित्यातील विविध लेखनप्रकारांची माहिती घेणे.
५) प्रस्तुत अभ्यासक्रमातील अभ्यासघटकांच्या आधारे तत्कालीन परिस्थितीवर प्रकाश टाकणे.
प्रकरणे
१)बखर गदय –
बलप्रकरण – दूत म्हणजे राजाचे नेत्र – मल्हार रामराव चिटणीस –सप्तप्रकरणात्मक राजनीति
२)पत्र
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जिवाजी विनायकास पत्र
३) चरित्रउतारा
विवेकानंद : धर्म आणि विज्ञान - दत्तप्रसाद दाभोळकर –शोध स्वामी विवेकानंदाचा
४) प्रबोधन
आ.ह. साळुंखे -आता आमच्या धडावर
प्रकरणे
५) आत्मचरित्र उतारा
उघडा दरवाजा – रामराजे आत्राम
६) अनुभव
माझा साक्षात्कारी ह्रदयरोग - अभय बंग
७) ललितलेख
गायी घरा आल्या – इंद्रजित भालेराव
८) व्यक्तीचित्र
मराठवाडयाचे गांधी : गंगाप्रसाद अग्रवाल – उत्तम सूर्यवंशी
ऐच्छिक मराठीच्या पदवी व्दितीय वर्षाच्या विदयार्थ्यांना वाङ्मयाच्या विविध प्रकार व प्रवाहांची ओळख व्हावी.
त्यांना साहित्याबद्दल गोडी निर्माण व्हावी. वाङ्मयाची अभिरूची वृध्दिंगत व्हावी.
साहित्याच्या विविध प्रकारांच्या संदर्भात उत्सुकता निर्माण व्हावी.
भाषेची विविध कालखंडाच्या टप्प्यावर बदलत जाणारी रूपे विदयार्थ्यांना माहित व्हावीत.
अशा हेतूंनी हा अभ्यासक्रम निवडला गेला आहे.
मराठी गदयाच्या इतिहासात लीळाचरित्रादी समृध्द महानुभाव गद्यानंतर आपल्याला शिवकालीन गद्य लेखनाकडे वळावे लागते.
यात ऐतिहासिक पत्र व्यवहार, ‘आज्ञापत्र’ सारखा राजकीय व्यवहाराचे धडे देणारा छोटासा ग्रंथ आणि चरित्रपर बखर वाङ्मय अभ्यासासाठी उपलब्ध आहे.
शिवकाल आणि पेशवाईतील निवडक ऐतिहासिक कागदपत्रे व काही बखरींच्या अभ्यासामुळे त्या त्या काळातील राजकारण, अर्थकारण,समाजकारण,भाषेचे उपयोजन, भाषेचे स्वरूप याचा अंदाज येतो. वाङ्मयीनदृष्टया या काळातील चरित्र वाङ्मयाचा फारसा अभ्यास झालेला दिसत नाही.
चरित्रवाङ्मय म्हणून शिवकालीन व पेशवेकालीन बखरींचा जो अभ्यास झालेला आहे तो साधारणपणे ढोबळ स्वरूपाचा आहे.त्यात इतिहास शोधण्याचा अधिक प्रयत्न झाला आहे.
हा लेखनप्रकार पद्यातील पौराणिक वाङ्मयाच्या संस्कारातून झालेला असल्यामुळे व त्यातील चमत्कृतींच्या प्रभावामुळे बखरी इतिहास म्हणूनही मान्यता मिळवू शकल्या नाहीत.
अरबी,फारशी, संस्कृत,मराठी या भाषंच्या समन्वयातून बखरी सिध्द झाल्या असल्यामुळे त्या गद्य वाङ्मयापेक्षा इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना अधिक जवळच्या वाटतात.
आत्मचरित्र आणि आत्मकथन हे आत्मपर गद्य वाङ्मयप्रकार मराठीत चांगलेच दृढमूल व विकसित झालेले आहेत.यातही वेगवेगळया समाजघटकांनी लक्षणीय योगदान दिल्यामुळे समाजदर्शन आणि वाङ्मयीन विशेष मूल्ये यांचा अभ्यास /आस्वाद शक्य होतो.
मराठीत स्त्रियांनी केलेले आत्मचरित्र व चरित्रलेखन सुरूवातीपासूनच संख्यात्मक व गुणात्मकदृष्टया लक्षणीय आहे.
मराठी साहित्यप्रकारात ललित गद्याचे स्थान अतिशय महत्वाचे आहे.एकूणच साहित्यप्रकारात ललित गद्याचा गुणानुक्रम कवितेनंतर येतो.
कथात्मकता वगळून होणारा वाङ्मयीन आविष्कार म्हणजे ‘ललित गद्य’ असे ढोबळ मानाने म्हणता येईल.
वैचारिक साहित्याचा समावेश करण्यामागचा हेतू विद्यार्थ्यांना सामाजिक, राष्टीय,राजकीय,धार्मीक इ. जीवनविषयक विविध अंगांची जाणीव करून द्यावी हा आहे.
एकूणच या अभ्यासक्रमातील अभ्यासघटक निवडीमागचा उद्देश वाङ्मयाच्या विविध प्रकाराबरोबरच विषयाची सूक्ष्मता व व्यापकता वाढविण्यास या अभ्यासघटकांचा निश्चित उपयोग होईल.
प्रकरण १ले- बखर गद्य
बलप्रकरण – दूत म्हणजे राजाचे नेत्र
मल्हार रामराव चिटणीस
सप्तप्रकरणात्मक राजनीति
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रस्तावना – मराठी गद्य सारस्वताच्या इतिहासातील बखर वाङ्मयाचे स्थान महत्वपूर्ण असे आहे. बखर ग्रंथांना ‘मराठेशाहीच्या तेजस्वी पराक्रमाचे नंदादीप’ असे म्हटले आहे. खबर (वार्ता,समाचार,वृत) या अरबी शब्दाचा विपर्यास होऊन बखर शब्दाची निर्मिती झाली आहे.
बक= बकणे म्हणजे बोलणे या धातूपासून बखर शब्दाची निर्मिती झाली असावी असे इतिहासाचार्य राजवाडे यांना वाटते.त्यावरून पूर्वीच्या काळी बखरी,लिहिण्याऐवजी तोंडाने बोलल्या जात असाव्यात, असा तर्क करणे भाग पडते. पण बखरीची मूळ कल्पनाच परकीय असल्याने राजवाडे यांची वरील व्युत्पत्ती मान्य होणे कठीण आहे.
बखर या शब्दाचा रूढ अर्थ राजकीय स्वरूपाचे ऐतिहासिक लेखन असा आहे.ऐतिहासिकवृत कथनाच्या गरजेतून मराठी बखर वाङ्मयाची निर्मिती झाली.
मराठयांच्या इतिहासातील निरनिराळया घटना– प्रसंगांवर जवळजवळ दोनअडीचशे बखरी लिहिल्या गेल्याचे राजवाडे सांगतात.
इंग्रजी काळातही काही पौराणिक, मिशनरी चळवळविषयक,ऐतिहासिक बखरी लिहिल्या गेल्या.रचनाकाळाच्या दृष्टीने महिकावतीची बखर ही सर्वात जुनी बखर होय.ही बखर गद्यपद्यमिश्रित अशी आहे,पण बहुतेक सर्व बखरींचे लेखन गद्यातूनच झालेले आढळते.
लेखक – परिचय : मल्हार रामराव चिटणीस
मल्हार रामराव चिटणीस सातारकर छत्रपती शाहू महाराज यांचे चिटणीस (सरकारी कारकून).सातारा जिल्हयातील बोरगावचे मूळ घराणे.उपनाम चित्रे. खंडो बल्लाळ चिटणीस यांचे पणतू.पुरातन सेवक व लेखनाधिकारी असा त्यांनी स्वत:चा केलेला उल्लेख यथार्थ आहे.चिटणीसांचे घराणे मराठेशाहीत स्वामीनिष्ठ म्हणून सर्वज्ञात आहे.
मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेल्या बखरी – ‘श्री शिव छत्रपतींचे सप्त प्रकरणातील चरित्र’, ‘छत्रपती संभाजी महाराज यांची बखर’,थोरले छत्रपती राजाराम यांचे चरित्र प्रकरण’, ‘धाकटे रामराजे यांचे चरित्र प्रकरण, ‘धाकटे शाहू छत्रपती यांचे चरित्र’, त्याचप्रमाणे शुक्रनीतीच्या आधारे ‘राजनीती’ हा ग्रंथ त्यांनी रचला. मल्हार रामराव यांची शैली सुबोध आणि माहिती इतिहासाला धरून असते.
शिव छत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र
श्रीशिवछत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र ही शिवकालीन बखरींपैकी एक उल्लेखनीय बखर होय. या बखरीतील घटनांना कालानुक्रम नाही. पहिल्या प्रकरणात पूर्वजवर्णन आणि जन्मकथन असून युधिष्ठिरापासून वंशावळी दिल्या आहेत.राज्य-आक्रमण आणि सज्जन-सेवन या दुसऱ्या प्रकरणात शिवाजीने स्वराज्याचे तोरण बांधल्यापासून शिवसमर्थ भेटीपर्यंतचा भाग आहे.तिसरे प्रकरण अर्धे अधिक अफजलखानासाठी खर्ची पडले असून पुढे शिवाजीने उभ्या केलेल्या किल्ले आरमारांची माहिती आहे.चौथ्या प्रकरणात राज्यमर्यादास्थापन व पितृदर्शन ; पाचव्या प्रकरणात दिल्लीपतिपराभव, सहाव्यात दक्षिण दिग्विजय आणि सातव्यात राज्यभिषेक, शिवाजींचा मृत्यू अशी एकूण हकीगत आहे.
पहिल्या प्रकरणात कृत्रिम व अशुध्द वंशावळी, दुसऱ्या प्रकरणात शिर्क्यांची कन्या सईबाई हिच्याशी शिवाजींचे विजापुरास लग्न अशी विसंगती आढळते. यानंतरच्याही प्रकरणात अशाच विसंगती सापडतात.
दक्षिण दिग्विजय म्हणजे कर्नाटकची स्वारी हे प्रकरण वास्तविक राज्यभिषेक प्रकरणानंतर यावयास हवे होते.
त्यामुळे या चरित्रातील घटनांना कालानुक्रम राहिलेला नाही. अर्थात हे लेखन शिवाजी महाराजांच्या नंतर १२५ वर्षांनी झाले.त्यामुळे ते पुर्णतया निर्दोष होणेही अशक्यच.
दूत म्हणजे राजा याचे नेत्र होत
आतां दूत – प्रेषण म्हणजे दूत पाठविणें तें कसें म्हणाल तरि सांगतो. आपण जाऊन राजकार्य अवश्यमेव करूनच येईन असा ज्यास अभिमान व प्रौढ व स्मरणवान् व बोलणार व सकलशास्त्र जाणणार व शूर व कार्याचें ठायीं अति तत्पर असा असेल त्यासच योजून पाठवावा.
आता दूतांची लक्षणें तीन प्रकारचीं आहेत.तीं कशीं कशीं विचाराल तरि सांगतों.एक निसृष्टार्थ व मितार्थ व शासनवाहक असे तीन प्रकार.त्यांचीच विविक्षा सांगतों. निसृष्टार्थ म्हणजे देश,काल योग्य असें पाहून बोलणार यास निसृष्टार्थ म्हणावे. आतां मितार्थ सांगतों. जितकें सांगून पाठविले तितकेंच जाऊन बोलणार त्यास मितार्थ म्हणावें.
दूत म्हणजे राजा याचे नेत्र होत
आता शासनहर सांगतों. इकडील पत्र त्यास नेऊन द्यावे, तिकडील उत्तर यास आणून द्यावें, यास शासनहर म्हणावें. याजप्रकारें तीन लक्षणें दूताचे ठायी आहेत म्हणोन सांगितलीं. आतां निसृष्टार्थ दूत यांणी शत्रूकडे गेला असतां शत्रूनगराचे ठायी उगेच जाऊं नये. आधीं त्या राजियास सांगून पाठवावें. त्याची आज्ञा आणून नंतर त्याचें नगरांत प्रवेश करावा.गेल्यावरि राजसभेंतहि जाणें ते समयीं राजियास सांगून पाठवून त्याचें उत्तर आणून मग राजसभेंत जावें.सभेंत गेल्यावरि राजा यास अभिवंदन करून उभेंच रहावें.बसों नये.राजा येणें बसा म्हटलें तर बसावें.शत्रुराज्याचा सर्व शोध करावा व दुर्गांचाहि शोध घ्यावा. व दुर्गात रक्षकादि कसेआहेत व तेथें यंत्रेंआदि करून साहित्य कसें आहे याचाहि शोध घ्यावा.राजाकोशसंपन्न कसा आहे व यास मित्र कोण कोण आहेत,कितीक आहेत व सेना किती आहे,ती कशी आहे,हे पाहावे.
दूत म्हणजे राजा याचे नेत्र होत
राजाची छिद्रें असतील ती सकळ जाणून व प्रजेची राजा याचे ठायी अनुरक्तता कशी आहे किंवा उदास आहे, राजायाचें गुणवर्णन करिते किंवा नाहीं करीत,व फळेंकरून व द्रव्येंकरून व कर्मेंकरून राजास कशा भजतात याचा शोध घ्यावा व सभेचे ठायी आपले स्वामीची आज्ञा तदनुरूप भय पावत नाही (असें) नि:शंकपणें बोलावें.
आपले राजा याची व शत्रूकडे आला त्या राजाची-चतुर्विधवृत्त राज्यांत असावें तें पहिलें सांगितलें- त्या चतुर्विध प्रकारें करून राजाची स्तुति करावी व आणखी तीर्थें व आश्रम वगैरे स्थानें याचें वर्णन करून राजा यांस संबोधन द्यावे कीं, हा राजा व आपला राजा सकळ शास्त्रें जाणणार असे आहेत.हें बोलणें तें आणखी जन सभेंत बसले असतील त्यांशी बोलत असावें व जनांसि आपला राजा याचें ऐश्वर्य सांगावें.
तें कसें म्हणाल तरि प्रताप व कुल व ऐश्वर्य म्हणजे संपत्ति व दानशुरता व मिष्टान्नें करून ब्राम्हणभोजनें घालणार असा थोर परमदक्ष याजप्रकारें करून बोलावें व दूत जो येणें राजा आपणांसि अनिष्ट बोलिला असतांहि त्याचें सहनच करावें.
दूत म्हणजे राजा याचे नेत्र होत
आपणांस कामक्रोधही नसावा आणि वेतसी वृक्ष म्हणजे नदीचे ठायीं शेरणीचे वृक्ष उंच असे असतात,महापूरही आला तरी नम्रत्वें करून असतां कदापि भय पावत नाहींत,तसें प्रकारें दूत जो येणें नम्रत्वें असावें. व आपणांसि बोलिला असतां आपण त्यांसि धिक्कारून बोलूं नये.त्याचा अंतर्भाव काढावा.
आपण आपला अंतर्भाव देऊं नये.एकटेच निद्रा करावी व स्त्रियांचा संग करू नये व मद्यपानही करू नये.याचे कारण सांगतो.आपला अंतर्भाव निद्रेंत स्वप्नात बोलत उठल्या अन्यास कळेल, यास्तव एकटेंच निजावें. व स्त्रियांशी संग केला असतां कामासक्त होऊन त्यांशी कोणे समयी काय बोलणें पडेल न कळे व मद्यपानें करून अव्यवस्थपणेंही काय बोलणें घडेल न कळे, म्हणून तिन्हीं सांगितलेली कर्में करू नयेत.सकळ राज्याचा शोध घ्यावा व अरण्यें असतील त्यांचाहि शोध घ्यावा व राजा यांचे आसमंताम्दागीं कोण कोण राजे आहेत, राजियास अनुकूल कोण,प्रतिकूल कोण आहेत व युध्दास भूमि चांगली कोणती याचा शोध करणें हीं दूताचीं कर्में होत.
दूत म्हणजे राजा याचे नेत्र होत
दूत म्हणजे राजा याचे नेत्र होत. यास्तव दूतव्दारा राजा येणें सकळ जाणत असावे व परराज्यांतील वृत्तांत पाहत असावा.ही निसृष्टार्थ दूत सांगितला त्याची लक्षणें व कर्में होत.
अशाप्रकारे या प्रकरणातून दूत हा राजा याचे नेत्र कशा प्रकारे असतो. हे मल्हार रामराव चिटणीस यांनी ‘सप्तप्रकरणात्मक राजनिति’ या बखरी मध्ये सविस्तर वर्णन केले आहे. या प्रकरणातून आपण बखर वाङ्मयासंदर्भात थोडक्यात माहिती पाहिली तसेच मध्ययुगीन कालखंडातील राजांसाठी दूताचे असणारे महत्व हयाविषयी सविस्तर माहिती अभ्यासली.
गृहपाठ
‘दूत म्हणजे राजा याचे नेत्र होत’ या प्रकरणातून येणारे दूतांचे कार्य तुमच्या शब्दात व्यक्त करा.
प्रकरण २ रे �छत्रपती शिवाजी महाराज यांचे जिवाजी विनायकास पत्र
या कालखंडातील दुसरा गद्य लेखनप्रकार म्हणजे अस्सल ऐतिहासिक पत्र व्यवहार होय. शिवकालीन राजव्यवहारासाठी कोणत्या प्रकाराची भाषा उपयोजिली जात होती, हे प्रामुख्याने पाहता येते.
आजचा औपचारिक राजकीय,शासकीय पत्रव्यवहार व त्याची भाषा आणि शिवकालीन पत्रव्यवहाराची भाषा यांतील साम्य व फरक विद्यार्थ्यांना अभ्यासता यावा म्हणून ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवाजी विनायकास पत्र’ हे पत्रच पाठयघटक म्हणून निवडले आहे.
या पत्रात प्राकृत (मराठी) बरोबरच अरबी, फारशी या भाषांतील अनेक शब्द सहजपणे आले आहेत. या उताऱ्यातील भाषिक संरचना ही मराठी असली तरी अरबी,फारशी या भाषांतील अनेक शब्दांचा सर्वत्र वावर तसेच या शब्दांचे लक्षणीय प्राबल्य दिसून येते.
हे प्रमाण ढोबळमानाने चाळीस टक्के मराठी व वीस टक्के संस्कृत आणि चाळीस टक्के अरबी व फारशी असे आहे.
परकीय राज्यकर्त्यांच्या तसेच त्यांच्या भाषा व संस्कृतीचा,
राज्यव्यवहाराचा आपल्याकडील भाषा, संस्कृती व जीवनमानावर कसा
प्रभाव पडला,याचे निदर्शक हे पत्र आहे; मात्र पत्रलेखकाचा स्वभाव,
त्याची शिस्त, काटेकोरपणा, निर्भीडपणा, स्पष्टता आणि
नि :पक्षपातीपणा हे गुण या पत्रातून प्रतीत होतात.
छ.शिवाजी महाराजांच्या स्वभाव दर्शनासाठी व त्यांच्या राजकीय
व्यवहाराच्या अभ्यासासाठी, रयतेसंबंधीची त्यांची आस्था, आपुलकी
लक्षात यावी यासाठी हे पत्र अतिशय महत्वाचे आहे.
इतिहास :-�
जंजीऱ्याच्या सिद्धीचा कोकण पट्टीला उपद्रव होत होता. त्याला आळा घालणे आवश्यक होते. त्यासाठी शिवरायांनी मुरुडजवळ सामराजगड बांधून सिद्धीच्या जमिनीवरील हालचालींवर नियंत्रण आणले.
तर सिद्दीच्या समुद्रावरील हालचालींना जरब बसविण्यासाठी महाराजांनी मुरुडजवळ समुद्रात असलेल्या कासा बेटावर किल्ला बांधायचा निर्णय घेतला. त्याचबरोबर पाथरवट, गवंडी, लोहार, सुतार यांची रवानगी कासा बेटावर करण्यात आली.सिद्दी हि बातमी कळल्यावर तो अस्वस्थ झाला, कारण या किल्यामुळे त्याच्या समुद्रातील हालचालींवर मर्यादा येणार होत्या. त्याने आरमार घेऊन चढाईची तयारी केली होती. परंतु महाराजांनी सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी दर्यासारंग दौलतखानची आधीच नेमणूक केली होती. किल्याची रसद पुरविण्याचे काम प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपवली होती. या कामात हयगय झाल्याचे कळताच महाराजांनी १८ जानेवारी १६५७ ला जिवाजी विनायक यांना खरमरीत पत्र लिहून त्यांची कान उघडणी केली होती. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी रात्र दिवस एक करून सिद्धीशी लढत लढत किल्ल्याची उभारणी केली. पद्मदुर्ग चे पहिले हवालदार म्हणून शिवरायांनी सुभानजी मोहिते यांची निवड केली.
सागरी किल्ला पद्मदुर्ग
रायगड जिल्ह्यातील मुरुड मधल्या जंजिरा किल्यापासून काही अंतरावर समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या ह्या पद्मदुर्ग म्हणजेच कासा किल्ल्याला विशेष महत्व आहे.
किल्ला तसा छोटासाच पण सहा बुरूजांनी युक्त भक्कम तटबंदी किल्ल्यावर बऱ्याच ठिकाणी कमळाची चित्र कोरलेली दिसतात. या मुरुड गावाजवळ जंजिरा,सामराजगड आणि कासा उर्फ पद्मदुर्ग असे किल्ले आहेत. जंजिरा किल्याला पर्याय आणि सिद्धीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी हा किल्ला उभारला गेला मात्र इतिहासाची पाने चाळल्यावर हे स्वप्न अधुरेच राहिले म्हणायला हवे.�
मुरुड गावातून राजपुरीकडे जाणारा गाडी रस्ता आहे.या रस्त्यावरच्या खाडीलगत एकदरा गाव आहे.या ठिकाणाहून या किल्यात बोटीने जाता येते. दुर्गात प्रवेश करताच याची भव्यता कळून येते.
कासा किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट.
पडकोट मोठय़ा प्रमाणावर नामशेष होत आला आहे.पद्मदूर्गच्या पडकोटचा वैशिष्ट्येपूर्ण कमळाच्या आकाराचा भव्य बुरुज दूरुनच आपले लक्ष वेधून घेतो.
मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तमपैकी शाबूत आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरुन उभा आहे.�पद्मदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचे एक वैशिष्ठ येथे पहावयाला मिळते. तटबंदीच्या दोन दगडांमधे चुना वापरलेला आहे.
गेल्या साडेतीनशे वर्षामधे सागराच्या लाटांच्या तडाख्याने आणि खाऱ्या पाण्यामुळे तटबंदीचा दगड झिजून गेला आहे. या दगडाची झीज पाच ते दहा से.मी.एवढी झाली आहे. तरीही दोन दगडांमधला चुना अजूनही शाबूत आहे. शिवकालीन बांधकामाचे हे वैशिष्ट्य आपल्याला चकित करते. पडकोटामधील चौकोनी विहीर, तोफा, इमारतींचे अवशेष पहायला मिळतात.�
दुर्गाचे मुख्यद्वार पूर्वेकडे तोंड करून आहे. दाराच्या आतल्या बाजूला पहारेकर्याच्यासाठी केलेल्या देवडय़ा आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दोन बुरुज आहेत. या ३० फूट उंच बुरुजात तोफा ठेवण्यासाठी झरोके व जागोजागी जंग्या आहेत. तसेच बाजूच्या तटबंदीत असलेल्या जंग्याचा व तोफांचा रोख प्रवेशद्वारावर आहे.प्रवेशद्वाराच्या बाजूच्या दगडांच्या भिंतीतील दगड लाटांच्या, वार्याच्या मार्याने झिजलेले आहेत.किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायर्यांचा मार्गही आहे. मधल्या भागामधे नव्या जुन्या वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात.�काही काळ भारतातील कस्टम ऑफिसचे एक कार्यालय येथे थाटलेले होते. चारही बाजुंनी खारे पाणी असताना आतमधे गोडय़ा पाण्याची चार टाकी केलेली दिसतात.किल्ल्याचा दर्या दरवाजा आणि त्याचे स्थापत्य पाहून परत नावेने फिरायचे.तटबंदीवरुन जंजिरा आणि सामराजगड किल्ले दिसतात. मुरुडचा किनाराही उत्तम दिसतो.�
गृहपाठ
‘शिवाजी महाराजांचे जिवाजी विनायकास पत्र’ या प्रकरणातून
शिवाजी महाराजांचे कोणते गुणविशेष दिसून येतात ते स्पष्ट
करा.