अक्षरलेणी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदयापीठ, नांदेड
यांच्या अभ्यासक्रमास अनुसरून व मंडळाच्या मान्यतेने बी.ए.,बी.कॉम.,बी.एस्सी.
व इतर पदवी प्रथम वर्षासाठी श्रेयांक (CBCS) पध्दतीनुसार व्दितीय भाषा मराठी
अभ्यासकमास नेमण्यास आलेले पाठयपुस्तक ( सत्र पहिले ) (MAR –S.L.-1) ‘अक्षरलेणी’
भाषा आणि साहित्य हे मानवी जीवनाचे मुलाधार असतात. मानवी जीवन अधिक उन्नत आणि समृध्द करण्यामध्ये मातृभाषेचा सिंहाचा वाटा असतो. मराठी ही आपली मातृभाषा ,तिच्या सम्रग सौंदर्यासह व्दितीय भाषेच्या या आपल्या पाठयपुस्तकातील निवडलेल्या वेंच्यामधून आणि कवितांमधून आविष्कृत झालेली दिसेल.प्रस्तुत पाठयपुस्तक मराठी विषय शिकणाऱ्या विदयार्थ्यांना नव्या संधीची दारे खुली करील,त्यांचा दृष्टिकोन व्यापक करील असा विश्वास वाटतो.
अनुक्रमणिका - गदय विभाग �
१. ससीक-रक्षण – म्हाइंभट
२. साहुकार म्हणजे राज्याची शोभा - रामचंद्रपंत अमात्य
३. भावी जीवनाची उभारणी विदयापीठात होते –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४. क्रीडासंस्कृतीची गरज – डॉ.नरेंद्र दाभोलकर
५. पदरी पडलं पवित्र झालं - हिंमतराव बावस्कर
६. आमची आई : साधनाताई – डॉ. मंदा आमटे
७. झाडं लावणारा माणूस – मकरंद कुलकर्णी
८. दयोतक – कृष्णा किंबहुने
पदय विभाग
१. समयासी सादर व्हावे – संत सावता माळी
२. बिकट वाट वहिवाट नसावी – अनंत फंदी
३. आईची आठवण – माधव जूलियन
४. माणसा इथे मी तुझे गीत व्हावे – वामनदादा कर्डक
५. सूर्यनारायना – ना. धों. महानोर
६. उतराई – गोविंद काळे
७. ही पृथ्वी स्त्रीलिंगी आहे – पी. विठ्ठल
८. सूप आणि जातं – स्वाती शिंदे-पवार
उपयोजित मराठी
१. प्रमाण मराठी लेखनाचे अनुस्वारविषयक नियम
२. शब्दांच्या जाती
ससीक- रक्षण - म्हाइंभट
म्हाइंभट – परिचय
- म्हाइंभट यांचा जन्म अहमदनगर जिल्हयातील सराळे येथे गर्भश्रीमंत बाम्हण कुटूंबात झाला.महानुभाव संप्रदायातील विद्वान गृहस्थ.’लीळाचरित्र’ या मराठी भाषेतील पहि ल्या चरित्र ग्रंथाचे लेखक. चक्रधरांच्या प्रयानानंतर सर्व शिष्य ऋध्दिपूरास एकत्र आले असता,आपल्या परमप्रिय गुरूच्या लीळांचे स्मरण त्यांना होणे अत्यंत स्वाभाविक होते. याच वेळी म्हाइंभटास लीळाचरित्राची कल्पना सुचली असावी.म्हाइंभटानी वेगवेगळया ठिकाणी जाउन चक्रधरांच्या सहवासात राहिलेल्या पंथीयांकडून लीळा गोळा केल्या आणि नागदेवाचार्यानी त्यांचा खरेपणा पारखून घेतला.अशा प्रकारे संकलन – संशोधन पध्दतीने हे चरित्रलेखन झाले.सत्यनिष्ठेच्या कसोटीमुळे त्यात विश्वसनियता आली आहे.आपल्या गुरूचे हे चरित्र एक प्रमाणग्रंथ होण्यासाठी मराठीतील या पहिल्या चरित्रकाराने घेतलेले परिश्रम अजोड आहेत. लीळाचरित्र हा ग्रंथ एकाक, पूर्वाध आणि उत्तरार्ध अशा तीन भागात विभागलेला आहे. या ग्रंथात लीळांच्या माध्यमातून म्हाइंभटानी श्रीचक्रधरस्वामींचे चरित्र रेखाटले आहे.
‘ससीक – रक्षण’ या लीळेतून श्रीचक्रधरस्वामींनी सशाचे रक्षण करूण सशाला पकडण्यासाठी पैज लावणा-या पारध्यांना अहिंसेचे महत्व विशद केले आहे.ही लीळा अत्यंत –हदय स्पर्शी आहे. सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करावे , विनाकारण प्राण्यांना त्रास देउ नये. असा बोध आपणास या लीळेतून मिळतो. एकूणच काय तर श्रीचक्रधरस्वामी हे संपूर्ण भूतलावरील प्रांण्यावर प्रेम करत होते.
श्रीचक्रधरस्वामींच्या कार्याचा थोडक्यात परिचय खालील प्रमाणे सांगता येईल.
१)मराठी भाषेचा सन्मान २) सुधारक विचारांचा प्रसार
३) जाति प्रथेचे निर्मूलन ४) परिवर्तनाची हाक
देशभर जातीजातींच्या उतरंडी रचल्या गेल्या होत्या. वरच्या जातीचा माणूस खालच्या जातीच्या लोकांना शूद्र मानीत असे. त्यामुळे काही वरच्यांचे कनिष्ठत्व मान्य केले तरी अनेक खालच्या जातींचे वरिष्ठत्व मिळाल्याचा खोटा आनंद मानण्यात सर्वच जाती समाधानात असायच्या.
या जातींच्या उतरंडीमुळे जातीजातीत दुरावे निर्माण झाले होते. खालच्या जाती वरच्यांना अस्पृश्य वाटत असत. त्यामुळे भारतीय समाज एकसंघ राहिला नव्हता. आपल्या जातीपुरता वेगळा समाज मानणाऱ्या हा देश एकात्म राहिला नव्हता. त्याची अनेक शकले झालेली होती. अशा काळात श्रीचक्रधर स्वामींचे आगमन महाराष्ट्रात झाले.
या महान परिवर्तनवादी धैर्यधराचे महाराष्ट्रात अवतरण झाले तो काळ १२ व्या शतकाचा होता. त्यांचा जन्म मात्र गुजराथेत झाला होता. त्यांनी आपला देश, आपले स्वजन, स्वसंबंध आणि स्वसंबंधीयांचे संबंध त्याज्य केले होते. ते म्हणायचे, “संबंध त्याज्य: स्वसंबधीयांचा संबंध तो विशेषतः त्याज्य:” हा त्यांचा उपदेश त्यांनी आपले आचरणात उतरविलेला होता. आपले पूर्वाश्रमीचे नाव, गाव, जात, कुळ, गोत्र विसरूनच ते येथे आले होते. त्यांना कुणीतरी विचारले होते, “गोसावीयाते कोण्ही असे?” त्यावर स्वामी म्हणाले होते, “याते कोण्ही नसे: काई हे ब्राह्मण: की क्षेत्रीय: की वैश्य की शूद्र: हे नेणीजे की बाई:” आम्ही आता संन्यस्त गोसावी झालेलो आहोत. आम्हांस आता जुन्या नावाची, गावाची, गोत्राची आठवण विसरले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती.
अशा जातीपातीच्या उच्च कनि ष्ठत्वाच्या भिंती बांधून जगणा-या समाजाला जातींचा उच्च - कनिष्ठत्वाचा विचार सोडा असे श्रीचक्रधर सांगत होते. ते म्हणायचे, “उत्तम भणिजे ब्राह्मण: आन आधम भणिजे मातंग: ऐसे म्हणे: परी तोही मनुष्य देहची: परिवृथा कल्पना करी:” त्यांचे हे परिवर्तनवादी विचार आपल्या शिष्यांनी कृतीत उतरवावे म्हणून ते म्हणायचे, “महारवाड्याहोनि धर्म काढावा!” “घर न निवडीता भिक्षा कीजे:” स्वामींची ही वैचारिक भूमिका त्यांच्या आचारांच्या आज्ञांमुळे तर अधिकच प्रभावी ठरली होती. वागण्यात आणि बोलण्यात संगती असणारा हा थोर परिवर्तनवादी महापुरुष म्हणूनच महाराष्ट्रातील युगंधर मानावा लागतो. त्यांनी दिलेली परिवर्तनाची हाक महाराष्ट्रात अपूर्व होती, नव्हे त्या काळापर्यंत संपूर्ण भारतात अशी सामाजिक, धार्मीक, परिवर्तनाची हाक कोणी दिलेली आढळून येत नाही.
ससीक – रक्षण
गावीं एकी व्रक्षाखालि आसन : तव पारधी वाटे ससा सोडीला: तयापाठीं सुणीं सोडिलीं: काकूळती येउनि ससा जानूतळि रीगाला:सूणी उभी राहिली:मागीलकडौनि पारधी आले:तेहीं वीनवीलें :’ससा सोडीजो जी’:सर्वज्ञें म्हणीतलें : ‘हा एथ सरण आला’ :पुडती तीहीं म्हणीतलें:जी जी: हा होडेचा ससा जी : याकारणें सूरीया काढणीया होती:जी जी :हा सोडावा जी’:एकी वासना : ‘कलि लागैल जी:ससा सोडीजो जी:’ सर्वज्ञ म्हणीतलें:हां गा:एथ सरण आलेया काइ मरण असे?: ‘जी जी: तरि हा गोसावी राखीला’:||रामेश्वरबास : निरूपण केलें: ‘हां गा : ए रानीं असति : पाणी पीति :याते तुम्हीं कां मारा?’ तीही म्हणीतलें: ‘जी जी आजिलागौनि न मारूं’||मग ते निघाले: सर्वज्ञ म्हणीतलें: ‘महात्मे हो! आतां जाए !’ ऐसें भणौनि जानु उचलली: मग ससा निगाला ||
श्री चक्रधर स्वामी एकदा सालबर्डीच्या जंगलात बसलेले असताना एक पांढरा शुभ्र ससा त्यांचेकडे जीवाच्या आकांताने धावत आला. त्याला श्वास भरून आला होता. नाक फुरफुरत होते. तो मुका प्राणि स्वामींना काही सांगू शकत नव्हता. परंत तो घाबरलेला आहे हे त्याच्या अवस्थेवरून स्पष्ट दिसत होते. तो स्वामींचे मांडीखाली येऊन बसला. या लहानशा प्राण्याची अवस्था पाहून स्वामींनी त्याला ओंजारले-गोंजारले. इतक्यात या सशां मागून दोन शिकारी कुत्रे समोरून धावत आले . ते सशाचा पाठलाग करीत होते. ते स्वामीजवळ येऊन भुंकू लागले
सशाला पकडायला आलेले हे हिंस्त्र श्वान स्वामी भोवती गरगरा फिरू लागले . भुंकू लागले. हे कुत्र्यांचे भुंकणे ऐकून हातात बाण घेतलेले दोन पारधी स्वामींचे समोर येऊन उभे राहिले . त्यांना स्वामींचे मांडीखाली दडलेला ससा दिसला. ते म्हणाले, “महाराज! हा आमचे होडेचा ससा आहे. ही आमची शिकार आहे. कृपया ती सोडावीजी : “त्यावर स्वामींनी म्हटले, हा आम्हांला शरण आलेला आहे. येथे शरण आले त्याला मरण नाही. तुम्ही याचा नाद सोडा. हा लहानसा मूक प्राणि जंगलाचा चारा खातो. जंगलाचे पाणि पितो. तुमचे काय घेतो? याला कशाला मारता?”
स्वामींचा हा उपदेश ऐकून त्यांच्या डोळ्यातील कृपाकिरणाच्या प्रभावाने ते हिंस्त्र स्वभावाचे पारधी पार बदलून गेले. ते म्हणाले, “महाराज! आपण आमचे डोळे उघडले. आजपासून आम्ही अशा गरिब प्राण्यांची शिकार करणार नाही.” स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि ते आणि त्यांची कुत्री गेल्यावर स्वामी सशाला म्हणाले, “जा आता. जंगलाचा चारा खा, नदीचे पाणि प्या निर्भय व्हा, आता हे पारधी तुमचे शत्रू राहिले नाही. जा.”
शब्दार्थ व गृहपाठ
शब्दार्थ –
ससीक - ससा , रीगाला - बसला, जानु - मांडी,
सूणी - कुत्री, होडेचा - पैजेचा.
गृहपाठ – ‘ससीक रक्षण’ या प्रकरणातून श्रीचक्रधरस्वामींनी अहिंसेचे महत्व कसे पटवून दिले आहे ते तुमच्या शब्दात विशद करा?