अजितचा वाढदिवस होता. त्याचे सर्व मित्र आणि नातेवाईक जमले होते. त्याला अनेक भेटी मिळाल्या. पुस्तके, खेळणी आणि कपडे. अजितच्या आत्याने त्याला एक नवलाईची भेट दिली. एक गुलाबाचे रोप. अजितला सगळ्यात आत्याची भेट आवडली. तो लगेच बागेत पळाला आणि त्याने ते रोप लावून टाकले. त्या रोपाला अजितने रोज पाणी घातले. सकाळी उठल्याबरोबर तो ते रोप किती वाढले ते जाऊन पाहू लागला. एके दिवशी त्याला गुलाबाच्या दोन कळ्या डोकावताना दिसल्या. तो निरीक्षण करीत राहिला. त्या कळ्या उमलल्या आणि त्याचे सुंदर पिवळे गुलाब झाले. त्याला आनंद झाला आणि तो उत्तेजित झाला. आईच्या मदतीने त्याने ती फुले खुडली. त्याने पहिले दोन गुलाब आईला व बहिणीला भेट दिले. अजितने आपल्या बागेत आणखी रोपे रोवण्याचे ठरवले.