उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.
'शिक्षण हाच सर्व सुधारणांचा पाया आहे', हा विचार सयाजीराव महाराजांनी स्वीकारला. समाजाच्या सर्व थरांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे, यासाठी त्यांनी बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याचा कायदा केला. त्यांनी अनेक गरीब व हुशार विदयार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन, त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करून परदेशी पाठवले. गोरगरिबांची व दलितांची पिळवणुकीतून सुटका केली. सर्व जाती-धर्मांतील मुलांना शाळांमध्ये प्रवेश देण्यास सांगितले. त्यांनी सार्वजनिक ग्रंथालयाचाही कायदा केला व वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन दिले.
शेतीची प्रगती करण्यासाठी धरणे बांधली. शेतकऱ्यांची सावकारांकडून होणारी छळवणूक थांबवली. लोकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, यासाठी सयाजीरावांनी कापडाची गिरणी सुरू केली. अनेक
उदयोगधंद्यांना प्रोत्साहन दिले. त्यांना देशाबद्दल प्रचंड प्रेम होते.
महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांना त्यांनी मदत केली. सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी सत्तेचा वापर केला. त्यामुळे आपण समाजसुधारक म्हणून त्यांचा गौरव करतो. सयाजीराव एक
आदर्श राजे होते.