प्रवेश करता येथे

कळफलक टंकू वाटे

बघता क्लिष्ट वाटले जरी

कठीण त्यात काही नसे

वर्डप्रेस ? हे काय आहे नेमकं ? आणि आम्हाला त्याची काय गरज ? असा प्रश्न प्रत्येक वाचकाच्या मनात आत्ता येत असेल. संगणकीय तंत्रज्ञानात तरबेज असलेल्यांना किंवा ज्यांचा स्वत:चा ब्लॉग आहे ते मात्र याबद्दल ऐकून असतीलच. वर्डप्रेस ही एक ब्लॉगरसारखीच, ऑनलाईन ब्लॉगिंग प्रणाली आहे.

वर्डप्रेसमध्ये देखील दोन प्रकार आहेत. एक वर्डप्रेस.ऑर्ग आणि दुसरा वर्डप्रेस.कॉम.

 1. वर्डप्रेस.ऑर्ग म्हणजे आपण एखाद्या सर्व्हरवर काही जागा आणि डोमेन नेम विकत घेऊ शकत असलो, तर त्या जागेत वर्डप्रेसची प्रणाली आपण टाकू शकतो. तिथे हवे ते बदल करायला आपल्याला मुभा असते.
 2. वर्डप्रेस.कॉम म्हणजे मात्र ब्लॉगरसारखीच. आहेत त्या मर्यादित सुविधांचा वापर करून ब्लॉग तयार करणे. अर्थात यातही पुन्हा css upgradation नावाचा एक पैसे भरूनचा पर्याय आहे. यात दिलेल्या सुविधांमध्ये तुम्हाला स्वत:ला , ब्लॉगचे काही रंग-रूप बदलावेसे वाटले तर त्याकरता css मध्ये जे काही बदल करावे लागतात ते करायची मुभा असते.

आपल्याला आता वर्डप्रेस.कॉम संबंधी माहिती घ्यायची आहे. त्यामुळे आता मी यापुढे जेव्हा वर्डप्रेस असा उल्लेख करीन तेव्हा तेव्हा तो वर्डप्रेस.कॉम संबंधी आहे हे कृपया लक्षात घ्या.

वर्डप्रेस ब्लॉगरसारखीच आहे म्हटलं खरं पण काही मूलभूत फरक या दोघांत आहे आणि तो म्हणजे........

 1. ब्लॉगरवरचा ब्लॉग सजवायला तुम्ही जावास्र्किप्ट कोड वापरू शकता जे वर्डप्रेस.कॉमवर वापरायला मात्र अनुमती नाही. वर्डप्रेसच्या निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार अश्या कोड्समधूनच ब्लॉगच्या सुरक्षिततेला धोका पोचू शकतो, त्यामुळे जर हे असे कोड वापरायचेच असतील तर खुश्शाल वर्डप्रेस.ऑर्ग वापरा. तुमच्या जागेत काय हवा तो धुमाकुळ घाला ;-)
 2. पण असं जरी असलं तरी ब्लॉगचे रंग-रूप बदलण्याकरता वर्डप्रेसकडे बरेच पर्याय उपलब्ध आहेत, जे ब्लॉगरवर वापरयाचे म्हटलं तर कोडींग केल्याशिवाय शक्य नाही आणि त्यामुळेच वर्डप्रेसचं वेगळेपण उठून दिसतं.

आता .कॉम की .ऑर्ग हा डोक्यातला गोंधळ जरा दूर सारा आणि वर्डप्रेस वरचे हे पर्याय समजावून घ्या. खरं तर वर्डप्रेस समजून घेण्याकरता स्व: वर्डप्रेसने ही ट्युट्स तयारी केलेली आहेत, जी इथे वाचता येतील / इथे पहाता येतील.

 1. वर्डप्रेस ने ’मराठी ’भाषेला अधिकृतपणे मान्यता दिलेली असल्याने, ब्लॉगवर दर्शनी दिसणारे सर्च किंवा संपादन ही लेबल्स देखील मराठीतून दिसतात आणि तुमचा ब्लॉग जास्त नैसर्गिक वाटतो.

 1. ब्लॉग तर तयार केलाय पण त्यावर लिहायचं काय असा प्रश्न पडला असेल तर वर्डप्रेसकडे याचे उत्तर आहे. प्लिन्की नावाच्या एका संकेतस्थळाशी आपला ब्लॉग जोडला की त्यांच्याकडून आपल्याला रोज एखादा विषय मिळतो. शक्य असेल तर लिहिलं नाहीतर सोडून दिलं. पण २०११ च्या सुरूवातीपासून वर्डप्रेसने स्वत:च हे काम सुरू केलयं. आपल्याला रोजच्या रोज ब्लॉग लिहायचा की आठवड्यातून एकदाच, हे एकदा ठरवलं आणि त्याप्रमाणे ह्या ब्लॉग ला भेट दिली की आपल्याला रोज नित्य नवा विषय मिळतो.

 1. एकदा वर्डप्रेसवर खाते सुरू केले की,त्या अंतर्गत आपण कितीही ब्लॉग सुरू करू शकतो. आणि प्रत्येक ब्लॉगकरता वर्डप्रेस आपल्याला देतं ३ जीबी जागा...कितीssssss ! ३ जीबी.

 1. बर्‍याचदा आपण वेगवेगळी माहिती आपल्या ब्लॉगवर डकवायचा प्रयत्न करत असतो. कधी एखादी विडियो फाईल,  कधी ऑडीयो क्लिप, कधी पिडीएफ, कधी दुसरी काही सुविधा. अश्या काही संकेतस्थळ / सेवांशी वर्डप्रेस चे हितसंबंध असल्याने त्यांचा एचटीएमएल कोड ब्लॉगवर डकवण्याची कसरत करण्यापेक्षा, वर्डप्रेस फॉर्मॅट म्हणून निवड केली की आपोआप हवा तो कोड निवडला जातो आणि  आपण काम सोप्पं होऊन जातं.

 1. वर्डप्रेस ब्लॉगरपेक्षा वेगळं गणलं जाण्याचं एक मुख्य कारण म्हणजे...वर्डप्रेसची कस्टम मेन्यु ही सुविधा. हेडर आणि पोस्ट याच्या मध्ये एक नेव्हिगेशन बार आपल्याला प्रत्येक ब्लॉगमध्ये दिसतो. ब्लॉगरमध्ये जी पृष्ठे आपण तयार करतो त्याची यादी आपल्याला एकापुढे एक दिसते. त्याव्यतिरिक्त काही वर्गवारीची नावे तिथे घालायची झाल्यास टेम्पलेटमध्ये बदल करावे लागतात. वर्डप्रेसमध्ये मात्र याची गरज लागत नाही. तुम्ही काय वाट्टेल ते म्हणजे पृष्ठे, वर्गवार्‍या, इतर पोस्टचे दुवे इ. घालू शकता. सब मेन्यु तयार करू शकता. थोडक्यात ब्लॉगवर आलेल्या व्यक्तिला एका झटक्यात ब्लॉगची वैशिष्ट्ये जाणवू द्यायची असतील तर कस्टम मेन्युसारखी सोय़ असणं गरजेचे आहे.

 1. दुसरी एक सोय म्हणजे फिचर्ड इमेजेस. याचा अर्थ या सोईचा वापर करून आपण प्रत्येक पोस्ट्करता / पेजकरता वेगळे हेडर दाखवायची व्यवस्था करू शकतो. अर्थात सगळ्याच टेम्पलेट्करता ही सोय उपलब्ध नाही..काही ठराविक टेम्पेलेट ही सोय देऊ शकतात.

 1. वर्डप्रेस मध्ये ब्लॉगरसारखी एचटीएमएल मध्ये बदल करण्याची मुभा नसल्याने टेम्पलेट मध्ये बदल करता येत नाहीत, इतकंच काय पण ब्लॉगरसारखी हवी ती टेम्पलेट उचलून बदलण्याचीही मुभा नाहीये. पण तरी देखील आजपावेतो १०२ मोफत टेम्पेलेट्स आणि १५ प्रिमियम पेड टेम्पेल्ट्स वर्डप्रेसने स्वत: उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपल्या आवश्यकतेनुसार आपण हवी ती टेम्पलेट निवडून ब्लॉगचे रंग-रूप बदलू शकतो.

 1. तिसरी एक सोय वर्डप्रेसमध्ये आहे,ती म्हणजे स्टिकी पोस्ट. एखादी महत्वाची पोस्ट तुम्हाला सातत्याने ब्लॉगच्या मुखपृष्ठावर दिसावी असं वाटत असेल तर त्या पोस्टला प्रकाशित करताना स्टिकी पोस्ट म्हणून प्रकाशित करावे.

 1. दिवसभर आपण इतक्या गोष्टी जालावर वाचत असतो. सगळ्याच नाही,पण काही गोष्टी आपल्याला आपल्या वाचकांपर्यंत आवर्जून पोचवाव्या असे वाटते. अश्या वेळी वर्डप्रेस आपल्याला प्रेस धिस नावाचे एक बुकमार्कलेट देते, जे आपल्या ब्राऊजरच्या टुलबारमध्ये लावायचे असते. एखादी आवडलेली बातमी /पृष्ठ शेअर करण्याकरता ह्या बुकमार्कलेटचा वापर करायचा, की त्या बातमीचा सारांश त्याच्या दुव्यासकट आपल्या वर्डप्रेस पोस्ट एडीटरमध्ये दिसतो, त्याला नाव, वर्गवारी देऊन आपण ते प्रकाशित केले तरी त्यात मुळ पानाचा दुवा असल्याने आणि बातमी पूर्ण नसल्याने आपल्यावर चौर्यकर्माचा आरोप तरी येऊ शकत नाही. बाकी एखादी बातमी अशी शेअर करायला मूळ मालकाची काहीच हरकत नसावी.

 1. आपल्याच एखाद्या पोस्टशी संबंधित आपल्याच ब्लॉगवरच्या आणि इतर ब्लॉगवरच्या पोस्ट आपल्या पोस्ट खाली दिसण्याकरता रिलेटेड पोस्ट चा वर्डप्रेसकडे आहे.पण दुर्दैवाने तो फक्त इंग्रजी ब्लॉग करताच चालतो.

 1. आपल्या ब्लॉगवर आपण एखादा दुवा दिलेला असेल तर; तो दुवा असलेले पान कसे दिसत असेल याची झलक स्नॅप टू ईट या विजेट्द्वारे पाहाता येते. दिलेल्या दुव्यावर माऊस नेला असता त्या दुव्याचा स्नॅपशॉट दिसतो.

 1. ब्लॉगरमध्ये फक्त १० पानांचीच परवानगी आहे. अर्थात एचटीअएमेल मध्ये बदल करून ही संख्या वाढवता देखील येते. पण वर्डप्रेस मात्र अमर्यादीत पाने तयार करायची मुभा देते.

 1. तयार केलेल्या पानावर फक्त मजकूरच हवा की बाजूला साईडबार विजेट देखील हवी हे ठरवण्याचा अधिकार देखील वर्डप्रेस आपल्याला देतं. प्रत्येक पानाला एकच मापदंड नाही. एखाद्या पानावर आपण साईडबार विजेट दाखवू शकतो, एखाद्या पानावर गरज नसेल तर काढूही शकतो. ही सोय आपल्याला मिळते पेज ऍट्रिब्युट मुळे.

 1. एखादा विडीयो, एखादी ऑडीयो क्लिप, एखादा दोन-चार ओळींचा सुविचार, फोटो गॅलरी हे सगळं नेमक्या वेगळेपणाने दाखवण्याची सोय आहे. आपण फक्त पोस्टचा प्रकार निवडायचा, की त्यापमाणे पोस्ट दिसत अर्थात हे बरचंस टेम्पलेटवर अवलंबून आहे.

 1. आपण लेख तर लिहिला; पण लोकांना कळणार कसं आपण काहितरी ताजं लिहिलं आहे यावर ? वर्डप्रेसवरचे लेख तुम्ही आपोआप आणि ताबडतोब फेसबुक प्रोफाईल / किंवा आपल्या मालकीचे फेसबुक पेज, ट्विटर, लिंक्ड इन, याहू आणि लाईव्ह मेसेंजर इ. ठिकाणी पाठवायची व्यवस्था करू शकता. इथे लेख प्रसिद्ध झाला रे झाला की त्याचा दुवा तिथे पोचलाच म्हणून समजा. तुमच्या मित्रमंडळींना त्याची माहिती लगेचच मिळते. हा ! आता ते वाचतात की नाही हा भाग अलहिदा ;-)

 1. समजा तुम्हाला लेख लिहायला वेळ नाहिये पण आलेला एखादा ईमेल तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करायचा असेल तर इथला मजकूर कापून तिथे डकवत बसायची अजिबात गरज नाही. वर्डप्रेस ने आखून दिलेल्या सूचनांचं पालन करून आणि त्यांच्या दिलेल्या फॉर्मॅट मध्ये आपण त्यांना, त्यांनी आपल्याला ठरवून दिलेल्या ईमेल वर फॉरवर्ड करू शकतो.

 1. इतकंच कशाला, समजा आपण कुठेतरी बाहेर आहोत,जवळ संगणक, इंटरनेट नाहीये पण आपल्या वाचकांना काहीतरी महत्वाची बातमी सांगायची आहे तर काय कराल ? आता बर्‍याचशा लोकांकडे स्मार्ट फोन आहेत हो, तुम्ही म्हणाल, त्यावरून लेख पोस्ट करू, त्यात काय मोठ्ठंसं ! हे ही खरंच म्हणा ! पण मग एखाद्याकडे स्मार्ट फोन देखील नाहीये, फोन मध्ये इंटरनेट जोडणी करता जीपिआरएस ची सोय देखील नाहीये. आता काय कराल ? बोला ! सोप्पं आहे. वर्डप्रेस च्या पोस्ट बाय व्हॉईस ची मदत घ्या. अगदी साध्या लॅंडलाईनचा वापर करून देखील तुम्हाला आपल्याला आपलं म्हणणं वाचकांपर्यंत पोचवता येतं.

 1. समजा सुरूवातीला आपण वर्डप्रेस.कॉम वर ब्लॉग चालू केला पण मागाहून ही सगळी बंधनं नको वाटली तर वर्डप्रेस.कॉम वरून वर्डप्रेस.ऑर्ग वर आपला आख्खा ब्लॉग हलवायची मुभा तर आहेच,शिवाय काही पैसे भरले तर आपल्याला वर्डप्रेस या सगळ्या ट्रान्सफरमध्ये मदत देखील करते.

 1. एखादा लेख आपण लिहिला पण त्यातील काही माहितीबद्दल आपण साशंक असू तर वर्डप्रेसच्या रायटींग हेल्पर मार्फतच आपण एक किंवा अनेक मित्र-मैत्रिणींना आपण लिहिलेला लेख पाठवू त्यात दुरुस्त्या सुचवायला सांगू शकतो, मत विचारू शकतो.

 1. समजा येणार्‍या वाचक व्यक्तीचे वर्डप्रेसवर खाते नाही पण फेसबुक किंवा ट्विटर वर खाते आहे आणि आपल्या एखाद्या लेखावर त्या व्यक्तिला मत मांडायचे झाल्यास आपले फेसबुक अथवा ट्विटर खात्याद्वारे प्रवेश करून आपले मत मांडू शकतात. त्याकरता वर्डप्रेसचे खातेधारक असण्याची बिल्कुल आवश्यकता नाही.

 1. आपल्या ब्लॉगवर येणार्‍या वाचकांना आपला ब्लॉग फॉलो करायची इच्छा असेल तर फॉलो नावाचं एक बटण खाली तळाशी दिसतं, त्यावर टिचकी देऊन , उघडून, त्यात आपला ईमेल आय़डी वाचकाने दिला की आपसूक त्या ईमेलवर आपले लेख वाचकांना मिळतात

 1. ट्विटर वर १४० अक्षरांच्या मर्यादेत इतकी भरगच्च माहिती आपल्याला क्षणोक्षणी मिळत असते, ती जर आपल्याला आपल्या ब्लॉगवर शेयर करायची झाली तर काय करणार ? नुसता त्या ट्विटचा दुवा देऊन त्यात काही गंमत नाही. एखाद्या वाचकाला त्या ट्वीटला उत्तर द्यायचं असल्यास, री ट्विट करायचे असल्यास किंवा फेव्हरीट करायचे असल्यास ते इथेच ब्लॉगबसल्या ;-) म्हणजे ब्लॉग वाचता वाचता करू शकतात ते ट्विटर ब्लॉकबर्ड पाय या सोयीमुळे.

 1. आपल्या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाची अपेक्षा तर आपण करतोच, त्यासाठी प्रत्येक लेखाखाली एक छोटासा प्रतिसाद देण्याकरता फॉर्म असतो, नाव,ईमेल पत्ता आणि प्रतिसाद इतकीच माफक माहिती त्यात भरायची असते. पण त्याव्यतिरिक्त काही जादा माहिती आपल्याला वाचकांकडून हवी असल्यास काय करणार ? त्यावेळी वर्डप्रेसचा फॉर्म बिल्डर आपल्या मदतीला येतो.

 1. आपल्या वाचकांशी संवाद साधण्यकरता पोल ( मतदान) घेणं हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. वाचकांचे मत विचारात घेतल्याने त्यांनाही महत्व मिळते. त्याकरता वर्डप्रेस चा पोल पर्याय उपयुक्त आहे.

 1. आपल्या लेखात त्याविषयासंबंधी काही छायाचित्र, इतर दुवे, टॅग्ज जर्जोडायचे असतील तर वर्डप्रेसचचे  झेमंटा या सेवेशी असलेले हितसंबंध कामी येतात. अर्थात हा पर्याय फक्त इंग्रजी भाषेतील ब्लॉग्जकरताच उपयुक्त आहे.

 1. अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र, वर्डप्रेसबद्दल आपल्याला आत्ता माहिती मिळाली पण जर काही दिवस आपल्या हाती ही माहिती लागली असती तर आपण वर्डप्रेसवरच ब्लॉग तयार केला असता. असं वाटतंय ना ? काही हरकत नाही...अजूनही वेळ गेलेली नाही. काळजी नसावी. वर्डप्रेसच्या आयात सेवेबद्दल माहिती करून घ्या. तुमचा ब्लॉग कोणत्याही ठिकाणी असला तरी तो वर्डप्रेसवर आयात करता येईल.

 1. याखेरीज वर्डप्रेसने छायाचित्रे स्लाइडशो मार्फत दाखवणे, पोस्ट / पेज ला पासवर्ड देणे, एकच मोठ्ठी पोस्ट अनेक पानात विभागणे यासारख्या उपयुक्त सोयी उपलब्ध करू दिलेल्या आहेत. काही अपवाद वगळता एकही पैसा न भरता त्या वापरता येतात. आणि नेमक्या अशाच सोयी वापरण्याकरता ब्लॉगरवर एचटीएमएल मध्ये बदल करत बसावे लागतात. म्हणूनच केवळ एक जावास्क्रिप्ट वापरता येत नाही या कारणाकरता खट्टू होऊन अनेकदा माझा ब्लॉग वर्डप्रेसवरून ब्लॉगरवर हलवायचा विचार केला तरी वर्डप्रेस अश्या काही सुधारणा घेऊन सामोरं येतं की पुन्हा नव्याने त्याच्या प्रेमात पडावसं वाटतं :-) , त्या अर्थी ही लव्ह ऍण्ड हेट रिलेशनशिप आहे म्हणायला हरकत नाही.

( या लेखातले तंत्रज्ञानाशी संबंधित असलेले शब्द, वाचकांच्या गोंधळात भर पडू नये याकरता मराठी प्रतिशब्द न शोधत बसता  इंग्रजीतच वापरलेले आहेत.)

श्रेया रत्नपारखी

http://majhimarathi.wordpress.com