आणि माझी मान खाली गेली….! 

शीर्षक वाचून…

ओकची मान खाली गेली? चला बरं झालं… आता काहीतरी फजितीची मजा वाचायला मिळेल तसे म्हणून अनेकांचे चेहरे खुलले असतील! नाडीमुळे वैतागून काहींना बरे झाले असे वाटले असेल!! तर  शिवाजी महाराज संचारलेत कि काय असे वाटणार्‍यां काहींना ओकांवर महाराजांची नाराजी झाली असावी असे वाटले असेल! असे काय झाले असेल?

    आमच्या चीनच्या सहलीला १ वर्ष होते आहे. वीणा वर्ल्ड यांच्या तर्फे सहल मस्त झाली. त्यांच्या पिवळ्याधम्मक पिशव्या, रेनकोट, कमरेला लटकवायचे पाऊचेस, पासपोर्ट आणि अन्य महत्त्वाच्या कागदपत्रे ठेवण्यासाठी गळ्यातील लटकाऊ बॅग्ज आणि टोप्या यामुळे आम्ही पिवळ्या रंगात वीणामय झालो.

नंतर ते सामान वेळोवेळी वापरताना त्यांच्या कल्पकतेला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे. असे वाटत राहिले. असो…

… कालची गोष्ट. टू व्हीलरवरून दुपारच्या गरमीतून घरी परतत होतो. नगररस्त्यावरून नव्या एयरपोर्टवर जायच्या जोड रस्त्यावरून खाली उतरून गेलो. तो बरेच दिवसापासून तयार होता पण पिपे आणि काही अडथळे रचून कदाचित स्थानिकांच्या रोषामुळे चालू करायला कोणी धजत नव्हते. सजग नागरिक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र टाईम्स मधून माझ्या पुढाकाराने वाचा फोडली आणि तो रस्ता चालू झाला. त्याची वार्ता पेपर मध्ये आली होती ते सर्व आठवून मला आपला अभिमान वाटला. त्याची प्रतिक्रिया म्हणून वेगात जायला उतारावर चेव आला. ताठ मान वर करून मी रुबाबात होतो.

वीणा वर्ल्डची पिवळ्या रंगाची कॅप डोक्यावर घट्ट बसली होती. वेग आणखी वाढला तेंव्हा नेमकी वार्‍याची दिशा बदलली. कॅपच्या पुढच्या अर्धगोलाकारपट्टीत खालून हवा भरली अन् कॅप पतंगासारखी हवेत उडाली. अन् पडली रस्त्यावर मध्यात! डिओ थांबे पर्यंत मागून अनेक वाहने आली. पिवळ्याधम्मक रंगामुळे शक्यतो चुकवून ती पुढे पळत होती. आवडीच्या श्वानाच्या पिल्लाला कुरवाळत जवळ घेतात तसे, कॅप उचलल्यावर मनात उगी ऽऽ उगीऽऽ करत धूळ, कचरा झाडत पुन्हा शिरोधारी झाली…

पुन्हा डिओला वेग आला तेंव्हा तिला पुन्हा रस्त्यावर हरवायला नको म्हणून मान खाली घालून वार्‍याची मर्जी सांभाळून मला गप गुमान चालवणे भाग पडले…

घरी परतल्यावर रॅकला अडकवताना कॅप जणू म्हणत होती… साहेब, ‘मान’ राखायचा असेल तर विनम्रपणे मानेचा कोण खाली असू दे…